नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचे सर्वात कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, चीन आणि इराणने या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे जागतिक बाजारावर आणि सागरी व्यापारावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी सीएनबीसी वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ट्रम्प प्रशासन इराणच्या सरकारवर जागतिक स्तरावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात कडक प्रतिंबध लागू करण्याच्या तयारीत आहे. या निर्बंधांचा मुख्य उद्देश इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे हा आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने केवळ इराणलाच नाही, तर जे देश इराणसोबत व्यापारी संबंध कायम ठेवून आहेत, त्यांनाही अमेरिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या या भूमिकेवर चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. बीजिंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे एकतर्फी आर्थिक दबाव टाकणे हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. चीन आणि इराणचे व्यापारी संबंध जुने आणि घनिष्ठ आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्बंधांचा थेट परिणाम चीन आणि इराणच्या द्विपक्षीय व्यापारावर होऊ शकतो. चीनने वादावर लष्करी किंवा आर्थिक बळाचा वापर न करता केवळ कूटनीतिक आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला आहे.
इराणकडून निर्बंध फेटाळले; कारवाईमुळे चिंता वाढली
दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या नवीन निर्बंधांच्या धमकीला स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तेहरानने अमेरिकेच्या या पावलांना पूर्णपणे बेकायदेशीर आणि अमानवीय म्हटले आहे. इराणचे म्हणणे आहे की, अशा दबावामुळे प्रश्नांची सोडवणूक होण्याऐवजी मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढेल.
दुसरीकडे, अमेरिकन सेंट्रल कमांडच्या रिपोर्टनुसार, इराणच्या बंदरांकडे जाणार्या सागरी मार्गांवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६७ व्यापारी जहाजांना आपले मार्ग बदलण्यास भाग पाडण्यात आले. तसेच तीन जहाजे निष्क्रीय करण्यात आली असून, दोन जहाजांवर अमेरिकन सैन्याने प्रत्यक्ष चढून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
येमेनजवळ जहाज हायजॅक आणि हॉर्मुजची स्थिती
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एका धक्कादायक घटनेत, येमेनच्या समुद्राजवळ सहा सशस्त्र लोकांनी एका व्यापारी जहाजावर ताबा मिळवून ते सोमालियाच्या दिशेने नेल्याची माहिती ब्रिटनच्या मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सने दिली आहे. या घटनेमुळे लाल समुद्रातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जागतिक व्यापार धोक्यात आला आहे.
या सगळ्यात जगाचे लक्ष स्ट्रेट ऑफ हॉर्मुज या महत्त्वाच्या सागरी मार्गाकडे लागले आहे. ओमानने या मार्गाच्या सुरक्षेबाबत भाष्य करताना स्पष्ट केले आहे की, या क्षेत्रातील दीर्घकालीन स्थिरता ही परस्पर क्षेत्रीय शांततेवर अवलंबून आहे. ओमानने कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षात किंवा तणाव वाढवणार्या कृतीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आखातातून बाहेर पडणार्या तेल आणि गॅसच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.